मुंबई : एपस्टीन हा इस्त्रायलचा गुप्तहेर होता. त्याच्याकडे अनेक अमेरिकेतील धनाढ्य येत होते. मोदींशी एपस्टीनशी संपर्क 2014 मध्ये आला होता. ट्रम्प यांचा सल्लागार मोदींची भेट हवी असल्याने एपस्टीनकडे गेला होता. त्या सल्लागाराशी मोदींचा काय संबंध होता? एपस्टीनच्या ईमेलमध्ये केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी (तत्कालिन अमेरिकन राजदूत) यांचा उल्लेख असल्याचा दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
एपस्टीन फाईल्समध्ये जवळजवळ 30 वर्षांचा डेटा
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, एपस्टीन फाईल्समध्ये जवळजवळ 30 वर्षांचा डेटा आहे, ज्यात ईमेल्स, पत्रे, फोटोग्राफ, व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि ऑडिओ रेकॉर्डिंग यांसारखे प्रचंड मोठे इलेक्ट्रॉनिक पुरावे आहेत. हा सर्व पुरावा एपस्टीनच्या विरोधात चाललेल्या खटल्यांमध्ये प्रस्तुत करण्यात आला होता, हा सर्व पुरावा आता अमेरिकेच्या कायदा मंत्रालयाकडे आहे. अॅटर्नी जनरल हे राष्ट्रपती ट्रम्प यांच्या अधिकाराखाली काम करतात आणि सध्याच्या अटर्नी जनरल राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सहा महिन्यांपूर्वी कायदा मंत्री म्हणून नियुक्त केले आहेत. ही सर्व कागदपत्रे त्यांच्या ताब्यात आहेत.
एपस्टीन प्रकरण बाहेर कसं आलं?
पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले की, हे प्रकरण 1995-96 पासून चालू आहे आणि त्याची माहिती अमेरिकेत हळूहळू 2005 आणि 2010 मध्ये प्रकट झाली. या घटनेचा सूत्रधार जेफ्री एपस्टीन नावाचा एक मोठा धनाढ्य उद्योगपती होता. एपस्टीनने अल्पवयीन मुलींना आमिष दाखवून त्यांचे लैंगिक शोषण केले आणि उच्च पदस्थ बड्या बड्या धेंडांना त्यांचा देह विक्रय केला, ज्यामुळे अनेक बालिकांनी त्याच्याविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल केले होते. एपस्टीनचा मृत्यू ऑगस्ट 2019 मध्ये न्यूयॉर्कमधील हाय सिक्युरिटी तुरुंगात झाला; त्याने गळफास लावून आत्महत्या केली की बड्या लोकांनी त्याचा खून केला, याचे स्पष्ट उत्तर अमेरिकेत अजूनही आलेले नाही. हे प्रकरण इतके तापले की दोन्ही पक्षांच्या खासदारांना (राष्ट्रपती ट्रम्प यांना वाचवण्यासाठी) हे दडपणं अशक्य झाले, कारण मतदारांनी धमकी दिली की हे प्रकरण दडपल्यास त्यांना पुढच्या निवडणुकीत मदत मिळणार नाही. या वातावरणामुळे दोन्ही पक्षांच्या खासदारांना नाइलाजाने एफस्टीन संबंधीची सगळी कागदपत्रे, फोटो आणि व्हिडिओ गुप्तपणे प्रसिद्ध करावी लागली, ज्याला संयुक्तपणे एपस्टीन फाईल्स असे म्हटले गेले आहे.